जोगेश्वरीत इमारतीला मोठी आग, अनेक मजले भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

मुंबई : दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. त्यानंतरही मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील एका इमारतीमध्ये भीषण आग लागली. आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या इमारतीचे 4 मजले आगीच्या विळख्यात सापडले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहराम बाग जेएनएस बिझनेस पार्कमध्ये ही आग लागली. कमर्शिअल अशा या हाय-राईज बिल्डींमध्ये ही भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या इमारतीच्या अगदी वरच्या मजल्यावर असलेल्या रहिवाशांकडून मदतीसाठी बचावासाठी हाका मारल्या जात होत्या . त्यांचा जीव वाचवून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी देखील फायर ब्रिगेडचे जवान कसून प्रयत्न करत होते.
हेही वाचा – ‘विरोधकांचा ‘लाभ’ चव्हाट्यावर आणू!’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी जोगेश्वरी पश्चिम येथील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये आग लागली. गांधी शाळेजवळील बेहरामपाडा येथील एस.व्ही. रोडवरील एका उंच इमारतीत आग लागली. आग लागताच परिसरात मध्ये घबराट पसरली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई अग्निशमन दलाला (एमएफबी) 10:51 वाजता या घटनेची माहिती मिळाली. मुंबई अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लेव्हल-2 घोषित केले.
या आगीत आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग कशी लागली, त्याचं कारण अद्याप कळलेले नाही. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवून ती आटोक्यात आणली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.




