साहित्य विश्व: भारतामध्येही अनेक विकासाच्या संधी आहेत : डॉ. अनिल नेरुरकर
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये २० व्या जागतिक मराठी संमेलन
सातारा : “आम्ही गेल्या वीस वर्षापासून कोकणामध्ये व्यसनमुक्तीचे सामाजिक कार्य करत आहोत. तंबाखू खाण्यामुळे कर्करोगाचा धोका असतो हे युवकांना समजून सांगत आहोत. युवा पिढीने अमली पदार्थांना बळी पडू नये तसेच सोशल मीडियाचे एडिक्शन टाळून व एकलकोंडेपणातून बाहेर येऊन ज्ञानसाधना, कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वास ठेवून गुणवत्ता निर्माण केल्यास युवकांना भारतामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात विकासाच्या, उद्योग-व्यवसायांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.” असे प्रतिपादन डॉ. अनिल नेरुरकर यांनी केले आहे.
जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध मराठी मनाचा’ या प्रमुख थीमसह २० वे जागतिक मराठी संमेलन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे दिनांक १०, ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत मा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील हे संमेलन संपन्न झाले आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित होते. चित्रपट, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या परदेशातील मराठी व भारतीय मान्यवरांचा मुलाखतीतून जीवन प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला जात आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता ‘कर्मवीर भाऊराव पाटील गीतगंधाली कार्यक्रमाने झाला. प्रा. संभाजी पाटील व त्यांचे सहकारी यांनी गीतगंधाली कार्यक्रमाद्वारे कर्मवीरांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. सातारा येथील वैदेही कुलकर्णी व महेश म्हात्रे यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या प्रारंभी वैदेही कुलकर्णी यांनी ‘समुद्रापलीकडे’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमात प्रसाद वझे, प्राजक्ता वझे,(अमेरिका), डॉ.अनिल नेरुरकर, सचिन जोशी (दुबई), नेपोलियन आल्मेडा, मिहीर शिंदे (ऑस्ट्रेलिया) इत्यादी मान्यवरांनी आपल्या परदेशातील स्वयं कार्य कर्तुत्वाचा प्रेरणादायक जीवनप्रवास मुलाखतीद्वारे उलगडून दाखविला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अनिल नेरुळकर पुढे म्हणाले की कष्टाला पर्याय नाही. ‘युवकांनी आपण गरीब आहोत’ असे रड गाणे गात बसू नये. तर स्वकष्टाने, जिद्द, आत्मविश्वासाने नोकरी, उद्योग- व्यवसायाच्या वाटा शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.” असे त्यांनी यावेळी युवकांना आवाहन केले.
‘समुद्रापलीकडे’ ह्या मुलाखत कार्यक्रमांमध्ये प्रसाद वझे व प्राजक्ता वझे यांनी अमेरिकेमध्ये जाऊन नोकरी व्यवसाय सांभाळून मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये नाविन्यपूर्ण निर्मिती कशी केली या संदर्भाची माहिती सांगितली. तसेच अमेरिकेत मराठी मंडळाची स्थापना करून महाराष्ट्रीयन सण, उत्सव व संस्कृती जोपासण्याचे काम कसे केले. यासंदर्भात माहिती दिली. आपल्या मुलाखतीमध्ये योगीराज पवार म्हणाले की, ”परदेशामध्ये मित्र आणि माणसे जोडल्यास काम करणे सोपे होते”. नेपोलियन आल्मेडा यांनी ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन आपल्या नाट्य कलेची जोपासना कशी केली यासंदर्भात मनोरंजक पद्धतीने माहिती दिली. “माणसाजवळ जर काला असेल तर जगाचे रंगमंच कला तुमच्यासाठी उघडू शकते. म्हणून युवकांनी भाषेचा न्यूनगंड न ठेवता आपल्या कलागुणांची जोपासना केली पाहिजे.” असे त्यांनी यावेळी सांगितले. तर मिहीर शिंदे यांनी ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या शिक्षण विषयक व महाराष्ट्रीयन संस्कृतीबद्दल माहिती दिली.
दुबई येथील पेशवा रेस्टॉरंट चे संचालक सचिन जोशी यांनी हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती व कला, मनोरंजन परदेशामध्ये कशाप्रकारे जोपासले यासंदर्भात माहिती दिली. ” युवकांनी नाविन्यपूर्ण कल्पना जोपासल्या पाहिजे. कोणतेही काम लहान नसते. कष्ट करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आणि आत्मविश्वास आले असेल तर मराठी माणूस पुढे जाऊ शकतो.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘समुद्रापलीकडे’ या मुलाखत कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचा उल्हासदादा पवार व जयराज साळगावकर यांचे हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.