कोल्हापुरात कापूस गोदामाला भीषण आग लागून सुमारे ८० लाखांचे नुकसान
सलग पाच तास पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात

कोल्हापूर : सांगली रोड मार्गावरील आसरानगर बसस्टॉप समोरील कापूस गोदामाला आज भीषण आग लागून सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले. भर दुपारच्या उन्हात लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. इचलकरंजी महापालिका आणि हातकणंगले नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सुमारे ९ बंबांनी सलग पाच तास पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहू पुतळा परिसरात राहणारे मणीशंकर केसरवाणी यांचे सांगली मार्गावर आसरानगर बसस्टॉप समोर भाड्याच्या इमारतीत कापूस गोदाम आहे. नेहमीप्रमाणे आज दुपारी गोदाम बंद होते. मात्र दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोदामातून धूर निघताना एका महिलेला दिसला. काही क्षणांतच धुराच्या लोटांनी संपूर्ण परिसर व्यापला. या घटनेची माहिती मिळताच केसरवाणी कुटुंबीय धावत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोदामाचा दरवाजा उघडून पाहिले असता आत भडकते अग्नीरूप दिसून आले. त्यांनी तातडीने इचलकरंजी महापालिका आणि हातकणंगले अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली.
हेही वाचा – श्री विघ्नहर साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशनकडून उत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार जाहीर
काही वेळातच अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र गोदामात मोठ्या प्रमाणावर असलेल्या ज्वलनशील कापसामुळे आग अधिकच भडकत गेली. धुरामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे गोदामाचे पत्रे फोडून धुराला वाट मोकळी करण्यात आली. आगीचा भडका इतका तीव्र होता की, पाण्याचा मारा थांबला की आग वेगाने पसरत होती. आगीने परिसरातील इतर व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे नऊ बंबांच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत अखेर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीच्या तांडवात संपूर्ण माल जळून खाक झाला.
काही तरुणांनी प्रसंगावधान राखत मोठ्या प्रमाणावर कापसाच्या गाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आगीचे लोट पूर्वेकडून येत असताना तरुणांनी पश्चिमेकडून शर्थीचे प्रयत्न करत काही माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शॉर्टसर्किट किंवा गोदामाच्या बाजूला तण पेटल्याच्या ठिणगीतून आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कारण अद्याप स्पष्ट झालले नाही.
गोदाम मालक जागेवरच कोसळले
आगीत संपूर्ण गोदाम जळताना पाहून मालक मणीशंकर केसरवाणी भावनावश झाले आणि जागेवरच कोसळले. घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याची धावपळ उडाली असताना मणीशंकर यांना वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. काही काळ शुद्धीवर न आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्याही अश्रूंचा बांध फुटला होता.