Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

कल्याणमध्ये बनावट सिमेंट बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

कल्याणमध्ये बांधकाम व्यवसायात मोठी फसवणूक

मुंबई : कल्याणमध्ये बांधकाम व्यवसायात मोठी फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेकडील लोग्राम परिसरात अत्यंत गंभीर आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा प्रकार पाहायला मिळत आहे. या ठिकाणी चक्क नामांकित कंपन्यांचे डुप्लिकेट सिमेंट बनवण्याचा गोरखधंदा एका गोदामात सुरू होता. मात्र जागरूक नागरिक पवन दुबे यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वेकडील लोग्राम परिसरात अल्ट्राटेक, अंबुजा यासारख्या नामांकित कंपन्यांचे खराब झालेले, बांधकामास अयोग्य ठरलेले, आणि स्पष्टपणे ‘NOT FOR RESALE’ असे लिहिलेले निकृष्ट सिमेंट मोठ्या प्रमाणात आणले जात होते. यानंतर या सिमेंटच्या कचऱ्याचे खडे फोडून त्याची पावडर पुन्हा तयार केली जात होती. त्यानंतर, ही निकृष्ट पावडर हुबेहूब त्याच नामांकित कंपनीच्या नवीन बॅगमध्ये भरली जात होती. यानंतर हे बनावट सिमेंट बाजारात मूळ दरापेक्षा कमी किंमतीत दुकानदारांना विकले जात होते.

हेही वाचा :  “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके 

या सगळ्या प्रकाराने बांधकाम उद्योगात केवळ आर्थिक फसवणूक नव्हे, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे बनावट सिमेंट वापरून बांधलेली घरे किंवा इमारती भविष्यात कधीही कोसळू शकतात. यामुळे, कल्याण-डोंबिवली परिसरातील बांधकामांमध्ये या निकृष्ट सिमेंटचा किती वापर झाला आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. कारण हा संपूर्ण प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

मोठ्या प्रमाणात सिमेंट जप्त
याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तीन ते चार ट्रक भरले जात होते. तसेच सुमारे दहा ते बारा कामगार सिमेंट भरण्याचे काम करत होते. सुरुवातीला पवन दुबे यांनी विरोध केल्यावर नरेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने आपण जागेचा मालक असल्याचे सांगत त्यांना धमकावले. मात्र, कामगारांच्या चौकशीत ही कंपनी उल्हासनगरमधील नवीन भाटिया यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांनी तीन ते चार ट्रक आणि विक्रीयोग्य नसलेले मोठ्या प्रमाणात सिमेंट जप्त केले आहे.

जागेचा खरा मालक कोण याचा शोध सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या जागेचा खरा मालक कोण आणि हा बनावट सिमेंटचा धंदा कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू होता, याचा शोध घेतला जाईल. या गंभीर फसवणुकीमुळे बांधकाम क्षेत्रातील अनेक मोठी नावे आता पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button