Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

“प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही,” मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar : मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान, या दोन्ही धावत्या लोकल एकमेकांच्या जवळून गेल्याने  फुटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन काही प्रवासी खाली पडले.

सेंट्रल रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी लोकलमधून पडले. लोकलमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे हा अपघात असल्याची माहिती आहे. रेल्वे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा –  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत २०१७ चा फॉर्म्युला

शरद पवारांनी ट्वीट करत लिहिले की, “मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.”

“केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे,” असे म्हणत शरद पवारांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button