फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा ३५ अंशावर; कोकणातही उन्हाच्या झळा वाढणार, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उकडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही चढ – उतार होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या आठवड्याभरात मुंबईसह कोकणातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची चिन्ह आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. दरम्यान, अनेक भागातील कमाल तापमानात बुधवारी वाढ झाली आहे. आजही पारा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत बुधवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात झाली. येथील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. सामान्य तापमानापेक्षा ते ३.४ अंश सेल्सिअसने अधिक होते. यामुळे बुधवारी या हंगामातील आणि फेब्रुवारी महिन्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथील कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस होते. ते सामान्य तापमानापेक्षा ३.३ अंश सेल्सिअसने अधिक होते.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या आठवड्यात मुंबईसह कोकणात कमाल तापमानात वाढ होणार असून यादरम्यान तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. कोकणातील काही भागांमध्ये यापेक्षाही अधिक कमाला तापमान राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर राज्याच्या अनेक भागातील किमान तापमानात मोठा बदल झालेला नाही. येत्या काही दिवसात राज्यातील अंतर्गत भागात किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस इतके राहील, तर कोकण पट्ट्यातील किमान तापमान अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सध्या मध्य महाराष्ट्र आणि साताऱ्यात वाऱ्यांचा वेग अधिक आहे. विदर्भातील कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, पुणे परिसरात आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान बुधवारी डहाणू येथे नोंदले गेले. येथील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके होते. कोकण पट्ट्यातील अलिबाग वगळता सर्वच भागात कमाल तापमान ३३ अंशाच्या वर नोंदले गेले. अलिबाग येथे ३१.१ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर सर्वाधिक किमान तापमानाची नोंद अहिल्यानगर येथे झाली. येथील किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस इतके होते.




