WPL 2026 | दिल्लीची चौथ्यांदा फायनलमध्ये धडक; RCB विरुद्ध DC सामना आज, लाईव्ह कुठे पाहाल?

WPL Final 2026 | महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. एलिमिनेटरमध्ये दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सवर ७ गडी राखून विजय मिळवत सलग चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने थेट फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे एलिमिनेटरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवत फायनलचं तिकीट निश्चित केलं. दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करून सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ‘सरकारने वसूल केलेला टोल परत केला पाहिजे’; मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग कोंडीप्रकरणी राज ठाकरेंचा संताप
सामना केव्हा आणि कुठे?
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना ५ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.
हा सामना वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियम, कोटांबी येथे पार पडणार आहे.
सामना सुरू : संध्याकाळी ७ वाजता
नाणेफेक : सायंकाळी ६:३० वाजता
सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
हेड टू हेड रेकॉर्डमध्ये दिल्ली सरस
महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ ९ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दिल्ली कॅपिटल्सने ६ सामने जिंकले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विजय मिळवले आहेत. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले होते. त्यामध्ये प्रत्येकी एक सामना जिंकत दोन्ही संघांनी समान कामगिरी केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. स्मृतीने या हंगामात ८ सामन्यांत ४८.३३ च्या सरासरीने २९० धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर ३४२ धावांसह अव्वल स्थानी आहे. ऑरेंज कॅप पटकावण्यासाठी स्मृतीला आणखी ५३ धावा कराव्या लागणार आहेत.




