Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

“हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून समाजात परिवर्तन घडवून आणावे”; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर : हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने हिंदू संमेलन समिती, गंगापूर यांच्या वतीने भव्य “हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मार्गदर्शन करताना म्हणाले, “जगाला हेवा वाटेल असा चारित्र्यसंपन्न बलशाली समाज आपल्याला घडवावा लागेल. त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण तसे करावे लागेल. भारताच्या भविष्यासाठी हिंदू समाजच जबाबदार आहे. त्यासाठी हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून समाज परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

गंगापूर येथील जि. प. प्रा. शाळेच्या प्रांगणात आयोजित संमेलनात ते शुक्रवारी येथे बोलत होते. यावेळी हजारो हिंदू बंधू भगिनी व महंतांची उपस्थिती होती. या संमेलनास भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान) महंत रामगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र सरलाबेट), श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज (जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी आश्रम, श्री क्षेत्र वेरूळ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, आपल्याला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. समानता आपल्याला केवळ ओठात नको कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. आपल्या जगणे जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. आपण आत्मनिर्भर झालो तर आपल्या शक्तीला अर्थ राहील. ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या तर आपला समाज बलशाली होईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा –  राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील छत्रे यांनी केले. त्यांनी या संमेलनाची पार्श्वभूमी मांडली. आणि पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमात उपस्थित संतांनी आशीर्वचन करताना समाजाला समरसता व कुटुंब प्रबोधनासाठी मार्गदर्शन केले. भास्करगिरीजी महाराजांनी “संघाने मान अपमान सहन करत शंभर वर्षाचा प्रवास केला आहे. जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजाचे त्यांनी संघटन केलं. आता हिंदू समाजाने सामाजिक एकोपा ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले.

रामगिरीजी महाराजांनी बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधले. ते म्हणाले आपल्याला संघटित रहावे लागेल. आपल्या समाजातील जातीवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल. त्यानंतर शांतीगिरी महाराजांनी समाजाने आपल्या संस्कृतीचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विदेशी संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे. आपले कुटुंब सुसंस्कृत करा, ज्यामुळे आपला समाज सुरक्षित होईल, असे ते म्हणाले.

गाथामूर्ती रामभाऊजी महाराज यांनी लिखित स्वरूपात आशीर्वचन संदेश पाठवला. या कार्यक्रमाचा उद्देश सफल करून समाजाने येथील संत संदेश आचरणात आणावा असे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button