मोहन भागवतांच्या उपस्थितीत संघाची उच्चस्तरीय बैठक; ‘या’ महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा

RSS Meeting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)ची तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळ बैठक ३० ऑक्टोबर रोजी जबलपूर येथील कचनार सिटी येथे सुरू झाली. या बैठकीचा शुभारंभ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारत माता प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून केला.
बैठकीत संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, मुकुंदा, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, आलोक कुमार आणि अतुल लिमये, तसेच अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, ११ क्षेत्रांचे आणि ४६ प्रांतांचे संघचालक, कार्यवाह, प्रचारक व निमंत्रित कार्यकर्ते असे एकूण ४०७ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
बैठकीच्या प्रारंभी अलीकडेच दिवंगत झालेल्या समाजातील मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेढे, वरिष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, दिल्लीचे ज्येष्ठ नेते विजय मल्होत्रा, ज्येष्ठ वैज्ञानिक कस्तुरीरंगन, माजी राज्यपाल एल. गणेशन, गीतकार पीयूष पांडे, अभिनेते सतीश शाह, पंकज धीर, असरानी, तसेच आसामचे प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचा समावेश होता.
हेही वाचा – सूर्याच्या संशोधनाला चालना मिळणार… आदित्य एल १ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा….
त्याचबरोबर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मारे गेलेले हिंदू पर्यटक, तसेच एअर इंडिया दुर्घटना आणि हिमाचल, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब आदी राज्यांतील नैसर्गिक आपत्तीत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत देशातील विविध भागांतील नैसर्गिक आपत्तींमध्ये संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्यांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या बलिदान वर्ष, बिरसा मुंडा जयंतीची १५० वी वर्षपूर्ती, तसेच ‘वंदे मातरम्’ गीत रचनेच्या १५० वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमांवर चर्चा आणि विशेष वक्तव्य जारी करण्यात येणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गृह संपर्क अभियान, हिंदू सम्मेलन, सद्भाव बैठक, आणि जनसंगोष्ठी यांसारख्या प्रमुख उपक्रमांच्या नियोजनावरही चर्चा होईल.
तसेच, विजयादशमी उत्सवांची समीक्षा आणि देशातील सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे विश्लेषणही या बैठकीचा भाग असेल. ह्या तीन दिवसीय बैठकीतून संघाचे पुढील वर्षातील राष्ट्रीय आणि सामाजिक उपक्रमांचे दिशा-निर्देश निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




