राज्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार

मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये मध्य ते अतिमध्य पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उन्हापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात येत्या ५ दिवसांमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार आज पहाटे अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आज पहाटे नवी मुंबईतील उपनगरं, मुंबईतील विरार, वांद्रे, वडाळा, विलेपार्ले, घाटकोपर, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली, मानखुर्द, कुर्ला अशा अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. अशात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय आहे.
आज गुरुवारी मुंबईसह उपनगरात पहाटे पाऊस बरसला. अनेक भागांमध्ये काळ्या ढगांची चादर आहे. तर मुंबईवर पावसाचा शिडकावा झाला असला, तरीही सर्वांनाच आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांनाही वेग आला आहे. खरंतर, रविवारनंतर राज्यात पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता पाऊस पुन्हा सक्रीय होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
- बीड जिल्ह्यात तुफान पाऊस
बीड जिल्ह्यातील काल संध्याकाळपासू तुफान पाऊस बरसला. काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. पहिल्याच पावसात केज शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून नजिकच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.