राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Weather Update : यंदाचा मान्सून वेळीआधीच भारतात दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला असून २७ मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. १ जून ते ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. यातच आता राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा – विलंबाने तिकीट घेतल्यास प्रवाशावर कारवाई; ‘पीएमपी’ प्रशासनाचा निर्णय
महाराष्ट्रात यंदा मे महिन्याच्या मध्यात हवामानात मोठा बदल दिसून आला. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर २९ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १७ ते २० मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.