पुण्यात शिफ्ट झालो तर माझा राज मोरे होणार नाही- राज ठाकरे
मुंबई |
नवी मुंबई विमानतळ नामकरणावरुन सुरु असलेल्या वादावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई विमानतळ शिफ्ट होत असेल तर नाव कसं बदलेल? असं विचारताना त्यांनी विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहील असं सांगितंल आहे. तसंच उद्या जर मी पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार केला तर माझ नाव राज मोरे होणार नाही असा टोलाही लगावला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “मी नवी मुंबई विमानतळाला नवं नाव देण्याची मागणी केलेली नाही. उद्या जर मी पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार केला तर माझ नाव राज मोरे होणार नाही. त्यामुळे मुंबई विमानतळ शिफ्ट होत असेल तर नाव कसं बदलेल?,” अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.





