कोकणातील मुंबईकरांसाठी आज चिपळूण–पनवेल मेमू विशेष; पनवेल–रत्नागिरी मार्गावरही विशेष गाडी

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गावी आलेल्या कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेने चिपळूण–पनवेल मार्गावर अनारक्षित मेमू विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी धावणार आहे.
०११५८ क्रमांकाची चिपळूण–पनवेल विशेष मेमू गाडी दुपारी ३.२५ वाजता चिपळूण रेल्वे स्थानकातून सुटेल व रात्री ८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीला आंजणी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, साफेवामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबे असतील.
हेही वाचा – महापौरांच्या खुर्चीवर बसण्याआधीच संजय राऊतांची रितू तावडेंवर टीका; म्हणाले, “फक्त त्यांनी एक करावं…”
दरम्यान, पनवेलला पोहोचलेली हीच विशेष गाडी ०११५७ क्रमांकाने पनवेल–रत्नागिरी मार्गावर रविवारी रात्री ८.२५ वाजता सुटेल. ही गाडी सोमवारी पहाटे ४ वाजता रत्नागिरी येथे पोहोचणार आहे.
या प्रवासात आपटा, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, साफेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, आंजणी, चिपळूण, सावर्डे, आरवली आणि संगमेश्वर या स्थानकांवर गाडी थांबणार आहे. मतदानासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अक्षय महापदी यांनी दिली.




