शिवराजच्या मारहाणीमागे धनंजय मुंडे यांच्याच गुंडांचा हात; करुणा मुंडेंचा आरोप

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील लिंबोटा गावात एका तरूणाला मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. समाधान मुंडेसह त्याच्यासोबतच्या १०-१२ टोळक्याने शिवराज दिवटेचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेऊन बांबू व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात शिवराज दिवटेची भेट घेतली. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
करुणा मुंडे म्हणाल्या की, बीडमधील सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोसत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरच कारवाई करण्याची गरज आहे. देशांमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. तसेच ऑपरेशन हे बीडमध्ये सुद्धा राबवा. कारण या ठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत. शिवराज दिवटे यांना झालेल्या मारहाणीमागे धनंजय मुंडे यांच्याच गुंडांचा हात आहे. या सगळ्यांचा एन्काऊंटर करून टाका, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा – ISIच्या निमंत्रणावरून गोगोईंचा पाक दौरा; हिमंता बिस्व सरमांचा आरोप
तसेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही गुन्हेगारांच्या टोळ्या बीडमध्ये पोसत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही एका माळेचे मणी आहेत. दोघांमध्ये कुठलाही फरक नाही, असा आरोप देखील करुणा मुंडे यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना म्हणाल्या, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. मग ते बीडला जाऊन काय गुन्हेगारी कमी करणार? उलट बीडला ते आले तर आणखी जास्त गुन्हेगारी वाढेल, असा आरोप करुणा मुंडे यांनी अजित पवार यांच्यावर केला.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात शिवराज दिवटेची भेट घेतली. दिवटेच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेसंदर्भात मुंडे म्हणाले, ‘गुन्हेगाराला जात नसते, या घटनेला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न काही जण प्रयत्न करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे की हा वाद जातीय किंवा धार्मिक कारणामुळे नाही. तपासातून खरी कारणं लवकरच समोर येतील’, असं मुंडे म्हणाले