‘वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पेाहोचविण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचविण्याचे कार्य केले जाते.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार! CAA म्हणजे काय? वाचा सविस्तर..

सर्व प्रकारच्या वेदांना मुठमाती देत ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम,अमंगळ’ हा ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेने दिला आहे. संस्थेला १०० वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत करण्याचे कार्य होत आहे. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बंकटस्वामी सदनात राज्यभरातील विद्यार्थ्यांची सोय
सदरचे विद्यार्थी वसतिगृह दोन मजली असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ७७४.४० चौरस मीटर आहे. एकूण २० खोल्याचे स्वच्छतागृह सह बांधकाम करण्यात आले आहे. या वसतीगृहासाठी शासनाने १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून तळ मजल्यावरील एकूण १० खोल्याचे तर संस्थेच्या निधीतून पहिल्या मजल्यावरील एकूण १० खोल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेत राज्यभरातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांची येथे निवासाची सोय झाली आहे.





