ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

रावेत परिसरातील वीज-पाणीपुरवठ्याच्या समस्यांबाबत प्रशासन धारेवर!

आमदार शंकर जगताप ‘ऑन फिल्ड’ : अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून तातडीचे निर्देश

पिंपरी-चिंचवड: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किवळे, रावेत, मामुर्डी आणि विकासनगर परिसरातील वीज व पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारींची दखल घेत आमदार शंकर जगताप यांनी संबंधित विभागांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना मूलभूत सुविधा अखंडितपणे मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रशासनाला तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

आढावा बैठकीत महावितरण, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग आणि अग्निशमन विभाग यांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश जगताप यांनी दिले. यासोबतच संबंधित भागांतील वीज उपकेंद्रे अधिक सक्षम करणे, ड्रेनेज व्यवस्था सुधारणे आणि नियमित पाणीपुरवठ्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.

महावितरणच्या वरिष्ठ तसेच निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून जुन्या वीजवाहिन्या, तांत्रिक अडचणी आणि वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आपत्कालीन परिस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला.

पावसाळ्यात नागरिकांना वीज खंडित होणे, अंधार आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देतानाच पायाभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर दीर्घकालीन नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.

“नागरिकांना अखंडित वीज आणि पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वय, संवाद आणि तातडीची कार्यवाही या त्रिसूत्रीवर काम करून नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी ठाम भूमिका आमदार शंकर जगताप यांनी यावेळी मांडली.

“अतिवृष्टीमुळे नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागू देणार नाही. वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच अशा समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठीही ठोस नियोजन केले जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button