अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा मृत्यू, पत्नी-मुलगी जखमी

नाशिक | समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सिन्नर येथील शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी अनुराधा आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेळके यांची कार समृद्धी महामार्गावर कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की कार कंटेनरमध्ये अडकली होती. त्यामुळे बचावकार्य करताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
हेही वाचा : भारत–दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; सामने लाईव्ह कुठे पाहणार?
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अखेर क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील सीटवर जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी बसले होते, तर मागील सीटवर त्यांची मुलगी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जितेंद्र शेळके हे शिर्डी परिसरातील उद्योजक म्हणून ओळखले जात होते. विविध उद्योगांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि ते शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांचे अशोक खरात यांच्यासोबत काही आर्थिक व्यवहार असल्याची माहितीही समोर येत आहे. या अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





