‘मोंथा’ चक्रीवादळ परतले, पण… आजही वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर : मान्सून कधीचाच परतला. “मोंथा” चक्रीवादळ देखील येऊन गेले, पण अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे हिवाळा नक्की येणार की पावसाळाच कायम राहणार असा प्रश्न आता पडला आहे. दरम्यान, पाऊस अजूनही कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाळा म्हणजेच मोसमी पाऊस अधिकृतपणे परतला आहे. तरीही महाराष्ट्रात सातत्याने पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतात कापणीसाठी तयार असणारी पिकं या पावसामुळे आडवी झाल्याने बळीराजा त्रस्त आहे, तर आता सामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही हा पाऊस परिणाम करत आहे. त्यामुळे त्याचा मुक्काम आणखी किती वाढणार हाच प्रश्न सातत्यानने उपस्थित केला जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजनानुसार हा अवकाळी पाऊस इतक्यात निरोप घेणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसाची चिंतादेखील वाढली आहे. अद्यापही राज्यात काही भागाच आवकाळी पाऊस सुरुच आहे. राज्यातील जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड शहर आणि परिररात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परभणी शहरासह विविध भागालाही जोरदार पावसाचा तडाखा बसला असून, भिवंडी, नवी मुंबई, मुंबईतसुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीत म्हणजेच नागपूर शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासभराहून अधिककाळ कोसळलेल्या पावसाने शहर जलमय केले. ठिकठिकाणी पाणी साचले. दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, ढगांच्या गडगडटासह पावसाच्या हजेरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, दक्षिण कोकण आणि गोव्यामध्येसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून अवकाळीच्या तयारीनिशीच घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश’; राज्यमंत्री योगेश कदम
समुद्र अद्यापही खवळलेलाच असल्यामुळे मासेमारांना खोल समुद्रात, भरतीच्या वेळीसुद्धा न जाण्याचा इशारा दिला आहे. पर्यटनासाठी समुद्रकिनारी भागांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांनासुद्धा हाच इशारा लागू आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी तडाखा देत आहेत. आज सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मुंबईसह कोकणातही जोरदार पाऊस सुरू होता. पावसाची उघडीप असलेल्या भागात कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे.




