Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
पवना धरण परिसरात संततधार.. पवना धरण ९७.४५ टक्के भरले
दुपारी २ वाजता ८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होणार
पिंपरी : मावळ तालुक्यात पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने देखील पुणे जिल्हा घाट माथा क्षेत्रात पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मावळ तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या पवन मावळ विभागात रविवार, रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरण सध्या ९७.४५ टक्के एवढे भरले आहे. दरम्यान आज (दि.१८) दुपारी २ वाजता धरणातून ८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
पवना धरण पूर नियंत्रण कक्षाने म्हटले आहे की, पवना धरण सद्यस्थितीमध्ये ९७.४५ टक्के भरलेले आहे. पुणे जिल्हा तथा घाटमाथा परिसराकरिता हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास सुरुवात झालेली असून मोठा येवा धरणात प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज (दि.१८) दुपारी ०२ वाजता जलविद्युत केंद्राद्वारे ८०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. तसेच सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.





