‘दशावतार’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; दिलीप प्रभावळकरांसह तगडी स्टारकास्ट
‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : कोकणातील परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असलेला ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या सशक्त अभिनयाने सजलेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
चित्रपटात कोकणातील दशावतार ही पारंपरिक लोककला, मानवी भावभावना आणि जुन्या रुढींचे दर्शन घडते. ट्रेलरमध्ये विविध नातेसंबंध, संघर्ष आणि संस्कृती यांचा छान मिलाफ पाहायला मिळतो.
सुबोध खानोलकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून, त्यांनी सांगितल्याप्रमाणे “दशावतार” ही स्थानिक मातीशी जोडलेली कथा असूनही, तिचं वैश्विक अपील आहे. निसर्गरम्य कोकण, रंगीबेरंगी दशावतारी वेशभूषा आणि गूढ वातावरण यामुळे चित्रपटाला एक वेगळं वलय लाभले आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओश आर्ट हाऊस निर्मित हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
कलाकारांची तगडी मांदियाळी:
दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.





