Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘शासकीय विद्यानिकेतनचा लौकिक कायम राखण्यासाठी ठोस उपाययोजना करणार’; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई : शालेय शिक्षण विभाग विद्यार्थी हिताच्या विविध उपक्रमांना गती देत आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘शासकीय विद्यानिकेतन’च्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात असून विद्यानिकेतनचा लौकिक कायम राखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त महामेळाव्यात बोलताना सांगितले.

तत्कालिन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून राज्यात धुळे, छत्रपती संभाजीनगर, पुसेगाव (सातारा), अमरावती येथे आणि केळापूर (यवतमाळ) येथे शासकीय विद्यानिकेतन या निवासी शाळा स्थापन झाल्या. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेतलेल्या गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना येथे दर्जेदार शिक्षण दिले जाते. या विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांमार्फत शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नियमित पुढाकार घेतला जातो. त्याचप्रमाणे शाळेच्या उन्नतीसाठी मेळाव्याच्या माध्यमातून विचारमंथन केले जाते. या माजी विद्यार्थ्यांचा संयुक्त महामेळावा 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील बंटारा भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मंत्री भुसे यांनी माजी विद्यार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, विद्यानिकेतन शाळांच्या गरजांवर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. भौतिक सुविधा व डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा आहार, कला-क्रीडा सुविधा आणि इतर विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांनाही गती दिली जाईल. विद्यानिकेतनाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक सूचनांचे स्वागत करुन शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी येत्या 15 दिवसांत नियामक मंडळाची बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘मी राज ठाकरेंच्या घरात वाढलोय…’; गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेचं विधान चर्चेत

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शासकीय विद्यानिकेतनांनी राखलेली परंपरा ही राज्याच्या शिक्षण क्षेत्राचा अभिमान आहे. या संस्थांनी देशाला अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर दिले आहेत. शासनाने माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करावा, अशी भूमिका घेतली असून विद्यानिकेतनने ही परंपरा पूर्वीपासूनच कायम राखत पाचही शाळांचा एकत्र स्नेहमेळावा आयोजित केला ही उत्तम संकल्पना आहे. विद्यार्थीदशेच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात, त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा जोडणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांमार्फत शाळेसाठी विविध माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीबाबत देखील कौतुकोद्गार काढून 1971 नंतर शाळेतून उत्तीर्ण झालेले सुमारे 1500 माजी विद्यार्थी शाळेच्या उन्नतीबाबत चर्चा करण्यासाठी महामेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजातील नव्या अध्यायाची माहिती देताना मंत्री भुसे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात ‘सुपर 100’ निवासी शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस असून जिल्ह्यातील 100 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात प्रतिभा घडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पालकांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शिक्षणाबरोबर जीवनकौशल्यांचा परिचय व्हावा यासाठी शेती, बँका, रुग्णालये, वर्कशॉप, औद्योगिक प्रकल्पांना विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या जातील. राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित माजी सैनिकांच्या सहकार्याने सैनिकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शाळांमध्ये मराठी भाषा व राज्यगीताची सक्तीची अंमलबजावणी केली जात असून प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा चौथी आणि सातवीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात देशव्यापी स्वरुपात समाविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यातील सर्व धार्मिक व सामाजिक नेत्यांच्या माध्यमातून शिक्षणप्रचार करण्याचा तसेच वाईट सवयींपासून विद्यार्थ्यांना दूर राखण्याचा विभागाचा मानस असल्याचे सांगून विद्यार्थी आणि शाळांसाठी चांगल्या सूचनांचे स्वागत केले जाईल, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button