जेजुरी पालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी!
‘‘जगताप पॅटर्न’’ : सचिन सोनवणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

पुरंदर : जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा तापलेला माहोल शिगेला पोहोचत असताना अखेर भाजपने आपला नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. माजी आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून मा. नगरसेवक सचिन सोनवणे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने रणनीतिक पद्धतीने आपली बाजू मजबूत करत ही घोषणा केली.
नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करताना भाजपाचे जेष्ठ नेते व महामंत्री राजेश पांडे, जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे, निवडणूक प्रभारी दीपक नागपुरे, जिल्हाध्यक्ष शेखर वढंणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सचिन लंबाते, रवी जोशी, माजी नगराध्यक्ष विना सोनवणे, उमेदवार अलका शिंदे, सदानंद बारभाई, विक्रम माळवदकर, मंगलताई पवार, गणेश भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हेही वाचा – ‘शासकीय विद्यानिकेतनचा लौकिक कायम राखण्यासाठी ठोस उपाययोजना करणार’; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे
या प्रसंगी बोलताना माजी आमदार संजय जगताप यांनी, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश-राज्य विकासाचा मजबूत पाया तयार झाला आहे. या विकासधारेतून जेजुरी शहराचा सर्वांगीण विकास साधणार आहोत,” असा विश्वास व्यक्त केला.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांनी, “जेजुरीच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे प्राधान्य राहील,” असे सांगत जनतेचा विश्वास जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. जेजुरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारी संदर्भात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने योग्य वेळी दिलेला हा ‘तुरुपाचा पत्ता’ निवडणूक रंगतदार बनवणार एवढे मात्र स्पष्ट झाले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. नागरिकांच्या गरजा, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि शहराच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला गती देणे हे माझे प्राधान्य असेल. जनतेच्या विश्वासाच्या बळावर जेजुरीला आदर्श नगरपालिकेचे मॉडेल बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.”
– सचिन सोनवणे, भाजपा उमेदवार.




