महाराष्ट्रातील ‘या’ भागात झाला गारांचा पाऊस, राज्यात हवामानाचा ‘विचित्र’ खेळ

Weather Updates : राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. एकीकडे वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जालना, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि नंदूरबार भागात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी हाताशी आलेली पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
जालना तालुक्यातील रामनगर आणि कारखाना परिसरात दुपारी अचानक हवामान बदलले. गेल्या काही दिवसांपासून पारा चाळीशी पार गेल्याने नागरिक हैराण होते. मात्र, आज झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा पसरला. नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी या पावसाचा फटका बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे.
विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे उभे भातपीक जमिनीदोस्त झाले असून, गारांमुळे भाताचे दाणे गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कापणीला आलेल्या धान पिकाचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली शहरात सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सध्या लग्नाचा हंगाम (१४ मेचा मुहूर्त) असल्याने बाजारात मोठी गर्दी होती. मात्र, सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे ग्राहकांची आणि किरकोळ विक्रेत्यांची मोठी धांदल उडाली. झाडे कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
येत्या काही दिवसांत राज्यातील वातावरणात असेच बदल राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





