कम ऑन किल मी… उद्धव ठाकरेंच्या चॅलेंजवर एकनाथ शिंदे यांचं खणखणीत उत्तर, म्हणाले, मरे हुए को…

मुंबई : आज शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त दोन मेळावे पार पडले. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कम ऑन किल मी असा एल्गार केला. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्धापन दिनाच्या सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ९२-९३ च्या मुंबईतील दंग्यांची आठवण करून दिली. “९२-९३ साली जेव्हा दंगा भडकला होता, तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं. पुरे झालं. ती व्यक्ती कोण सांगणार नाही. ते हयात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी नाना पाटेकर यांच्या ‘प्रहार’ चित्रपटाचा संदर्भ दिला. “मी पिक्चर पाहिला. प्रहार पाहिला. नाना पाटेकर यांचा. त्यात नाना पाटेकर गुंडासमोर उभा राहतो आणि सांगतो ‘कम ऑन किल मी’. तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे. म्हणतोय ‘कम ऑन किल मी’. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभचा पिक्चर होता ना अॅम्ब्युलन्स घेऊन येतो. तसं येत असाल तर अॅम्ब्युलन्स घेऊन यायची. येताना सरळ याल. जाताना आडवे होऊन जाल.” असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
हेही वाचा – रामकृष्ण हरी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत!
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “इंग्रजी चित्रपट पाहून आले असतील. लंडनला सुट्टीसाठी गेले होते, असे एकनाथ शिंदे मिश्किलपणे म्हटले. “‘मरे हुए को क्या मारना है’, महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेत तुमचा मुडदा पाडलेला आहे. नुसता करून नाही शोर, मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही. त्याला मनगटात ताकद लागते. तोंडात दम असून चालत नाही, मनगटात दम लागतो. तो माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे.” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“तुम्ही आमच्या नादाला लागू नका. आम्ही तुम्हाला तीन वर्षांपूर्वी दाखवलं आहे. आम्ही तुमचे टांगा पलटी घोडे फरार केलेले आहेत. आमच्या नादाला लागू नका. हा एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय, धर्मवीर आनंद दिघेंचे तालमीतील हे लोक आहेत, हा एकनाथ आहे. आमच्या नादाला कशाला लागता. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. ‘हम किसीको छेड़ते नहीं, लेकिन किसी ने हमें छेड़ा तो हम छोड़ते नहीं.’ जाऊ द्या त्या भंगाराचेही अपमान करू नका.” असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला दिले.