मुख्यमंत्री 1 जूनला जाणार नाशिक दौऱ्यावर; सिंहस्थ मेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार

नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळ्याच्या पर्वस्नानांच्या तारखा निश्चितीसह तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी 1 जून रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात साधू-महंत आणि सिंहस्थाशी संबंधित १३ आखाड्यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर तारखांची घोषणा केली जाईल. सोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेब्रुवारीत सर्व यंत्रणांना दिलेल्या निर्देशांनुसार तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.
सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असली तरी, गत सिंहस्थाच्या तुलनेत यंदाची तयारी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे साधू-महंतासह नाशिककरांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले आहेत. सिंहस्थाच्या नियोजनासह साधू-महंताशी चर्चा करून सिंहस्थ तारखांची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
हेही वाचा – “पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागेल”; राजनाथ सिंह
प्रशासनाला सूचना मिळाल्यानंतर प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयात स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक होईल. या बैठकीस अखिल भारतीय आखाडा परिषदेतील तेरा आखाड्यांचे प्रत्येकी दोन असे २६ प्रतिनिधी, तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंत आणि पुरोहित संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. शाही स्नान आणि पर्वस्नानांच्या तारखा या बैठकीत जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे या बैठकीसाठी प्रशासन आणि धार्मिक संस्थांनी नियोजन सुरू केले आहे.