काळजी करू नका…! ज्यांचा घरात पाणी गेलं त्यांना १० हजार देणार; अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा करत, “ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे, त्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल,” असं स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांनी आज बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी गावातील पावसाने बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोसळलेली घरे, वाहून गेलेले रस्ते, वीज खांब यासारख्या नुकसानीच्या ठिकाणांना भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करून मदतीचे आदेश दिले. “पंचनामे सुरू आहेत. घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार रुपये देतो. लवकरच पैसे वर्ग करण्यात येतील,” अशी दिलासादायक घोषणा त्यांनी केली.
हेही वाचा – मुख्यमंत्री 1 जूनला जाणार नाशिक दौऱ्यावर; सिंहस्थ मेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार
दरम्यान, नुकसानग्रस्तांची यादी लवकरच प्रशासनाकडून अंतिम करण्यात येणार आहे. बारामतीत नुकतेच निरा कालव्याला तडे गेल्यामुळे अनेक गावांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही आर्थिक मदत कित्येक कुटुंबांसाठी दिलासा ठरणार असल्याने, राज्य सरकारच्या या पावसाळी मदतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गावातील नुकसानीचे पंचनामे उरकले का, धान्य द्यायला सुरुवात केली आहे. आता, ज्यांच्या ज्यांच्या घरात पावसाने पाणी गेलंय, त्यांना 10-10 हजार रुपये देतोय. लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो, काळजी करू नका, असं म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.