दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “याबाबत…”

Devendra Fadnavis : दिशा सालियनच्या मृत्यूवरुन बरेच आरोप २०२० मध्येही झाले होते आणि अधिवेशनातही हा विषय निघाला होता. दिशा सालियनच्या वडिलांनी पुन्हा एकदा कोर्टात याचिका दाखल केल्याने हा विषय चर्चेत आला होता. दरम्यान दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आल्याची माहिती समोर आली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला. तिचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचं समोर आलं. मी इतकंच म्हणेन की सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं. आमच्या तरुण मुलाला (आदित्य ठाकरे) तुम्ही जितका त्रास देत आहात त्याच्या वेदना त्याचे घाव आमच्याही हृदयावर होत आहेत. सज्जन मुलाचं चारित्र्यहनन केलं गेलं, कुणी केलं तर ज्यांनी त्याच्या घरचं मीठ खाल्लं त्यांनीच. असंही अरविंद सावंत म्हणाले.
दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झालेला नाही असं यात नमूद करण्यात आलं आहे. दिशाच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याचं आणि अनेक फ्रॅक्चर झाल्याने मृत्यू झाला आहे. डोळे, हात, पाय यांना जखमा झाल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे. ११ जून २०२० ला हे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं. ही बातमी समोर आल्यानंतर अरविंद सावंत यांनी टीव्ही ९ शी बोलताना सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“मला याबाबत तूर्तास माहिती मिळालेली नाही. माहिती मिळाली की मी या प्रकरणाबाबत बोलेन.” अशी एका ओळीची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.