BMC निवडणूक: मतदान केंद्रावर कमी प्रतिसादाबद्दल विशाल ददलानी नाराज, म्हणाले – “लाजिरवाणं आहे”
मतदान केंद्रांवर जनतेचा अल्प प्रतिसाद; लोकशाहीच्या जबाबदारीवर विशाल ददलानींचा सवाल

मुंबई : गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांनी गुरुवारी सकाळी मुंबईतील एका मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मतदान केंद्रावर नागरिकांची अत्यंत कमी उपस्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना विशाल ददलानी म्हणाले की, मतदान केंद्रावर “जनतेची उपस्थिती फारच कमी” आहे, तर आत अधिकृत कर्मचारीच जास्त दिसत आहेत, ही बाब “लाजिरवाणी” आहे.
“मी आता लोकांना मतदान करण्यासाठी सांगणं बंद केलं आहे. इथे पाहिल्यावर खूप वाईट वाटतं. प्रत्येक भारतीयाने हे पाहून वेदना अनुभवायला हव्यात. आपणच आपल्या देशाची काळजी घेतली नाही, जबाबदारी स्वीकारली नाही, तर जे चाललं आहे ते असंच चालू राहील,” असे त्यांनी सांगितले.
लोकशाही आणि निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले, “जो कोणी जिंकेल, त्यांनी निवडणुका वेळेवर घ्याव्यात, ही देशासाठी आणि लोकशाहीसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांत शहराची जी परिस्थिती आहे, ती पाहता परिस्थिती सुधारेल अशीच अपेक्षा आहे.”
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीला गुरुवारी संथ सुरुवात झाली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ७.१२ टक्के मतदान झाले होते. प्रारंभिक आकडेवारीनुसार महिला मतदारांच्या तुलनेत जवळपास दुप्पट पुरुष मतदारांनी मतदान केले आहे.
मुंबई शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वाधिक ११.५७ टक्के मतदान नोंदवण्यात आले, तर प्रभाग क्रमांक १६२ मध्ये सर्वात कमी म्हणजेच १.६८ टक्के मतदान झाले.
एकूण १,०३,४४,३१५ मतदारांपैकी ७,३६,९९६ मतदारांनी मतदान केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या (SEC) अधिकृत माहितीनुसार ४,५४,५३९ पुरुष मतदारांनी, तर २,८२,४३३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली असून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार आहे. मतमोजणी शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी होणार आहे.





