बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना
गोळीबाराची घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
बदलापूर : बदलापुरातील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहर हादरलं आहे. या घटनेनंतर बदलापुरातील जनता थेट रेल्वे स्थानकात घुसली होती. शेकडो आंदोलकांनी घटनेच्या निषेधात रेल्वे रुळावर उतरत रेल्वे वाहतूक बंद पाडली होती. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण आंदोलक आरोपीला जनतेच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होते. अखेर दिवसभर रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत रेल्वे मार्ग मोकळा केला होता. त्या घटनेनंतर आज पुन्हा बदलापूर रेल्वे स्थानक परिसर हादरलं आहे. कारण बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. एका इसमाने दोघांवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. एका इसमाने दोघांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.
गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. या व्हिडीओत पळापळ होताना दिसत आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. रेल्वे पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली. पोलिसांकडून आता या घटनेचा सखोल तपास केला जातोय. ऐन गर्दीच्या वेळी अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडणं हे धोकादायक आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात काय-काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.