कृषीमंत्री कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच प्रश्न; ‘कर्जमाफीचे पैसे घेता, पण शेतीत गुंतवणूक करता का?’

नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना प्रश्न विचारले. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेती नुकसानीची पाहणी आणि आढावा घेत असताना त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून प्रश्न केला की, “कर्जमाफीचे पैसे मिळाल्यावर त्यांचे काय करता? शेतीत गुंतवणूक करता का?” शेतकरी ५ ते १० वर्षे कर्जमाफीची वाट पाहतात आणि तोपर्यंत कर्ज भरतच नाहीत, असा टोमणा मारत त्यांनी सरकार शेतीसाठी भांडवली गुंतवणूक करत असल्याचा दावा केला.
हेही वाचा – ‘नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांची जागा सरकारने ताब्यात घ्यावी’; आमदार शंकर जगताप
“आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो, पण तुम्ही स्वतः गुंतवणूक करता का?” असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोकाटे यांनी सायंकाळी उशिरा अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. दिवसभर नाशिकमध्ये पक्षाच्या आणि इतर बैठकींमध्ये व्यग्र असल्याने त्यांना पाहणीला विलंब झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नाशिक जिल्ह्यातही शेतकरी संकटात सापडले आहेत.