ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोचे डंपिंग ग्राउंडमध्ये रूपांतर
ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमोरच नागरिकांची जेसीबीवर दगडफेक

ठाणे : ठाण्यातील मुल्लाबाग बस डेपोला सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात आले होते. याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करण्यास सुरुवात केल्यामुळे स्थानिक नागरिक आणि मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. भर वस्तीत असलेली ही जागा डंपिंग ग्राउंडसाठी निवडण्याच्या ठाणे महापालिकेच्या कृतीमुळे रहिवाशांमध्ये मात्र प्रचंड संताप आहे. ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमोरच नागरिकांनी जेसीबीवर दगडफेक केली.
शहरातील घोडबंदर रस्त्याला लागून असलेल्या मुल्लाबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोचे डंपिंग ग्राउंडमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोच्या परिसरात हिल क्रेस्ट सोसायटी, सत्यशंकर सोसायटी, कॉसमॉस, नीलकंठ ग्रीन, गणेश नगर असा मोठा रहिवासी पट्टा आहे. त्यात सुमारे सुमारे वीस हजार लोक राहतात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बांधत असलेला बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्प याच परिसरात आहे. शिवाय यातील काही भाग वन खात्याच्या अखत्यारीत येतो. महापालिकेच्या घंटागाड्यांनी शुक्रवारपासून या बस डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. रहिवाशांचा प्रचंड विरोध असतानाही हिरवळ आणि झाडी असलेल्या या भागाचे कचराकुंडीत रूपांतर करण्यात येत आहे.
हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य
नागरिकांनी अडवले डंपर
डेपोच्या जागी कचरा टाकायला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी कचरा टाकण्यास आलेले डंपर अडवले. त्यानंतर पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड हटवून भिवंडी आतकोली ठिकाणी नव्याने डम्पिंग ग्राउंड सुरू केले असताना देखील मुल्लाबाग या ठिकाणी पालिका कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड प्रक्रिया सुरू करत आहे. त्याबद्दल नागरिकांनी प्रश्न विचारला.
राज्य शासनाने ठाणे महापालिकेत भिवंडीतील आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी 34 हेक्टर क्षेत्र ठाणे महापालिकेत प्रदान केले. या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन केले जात आहे. त्यानंतर दुसरीकडे डम्पिंग ग्राउंड चा घाट का? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नागरी वस्तीत डम्पिंग ग्राउंड असू नये, असा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करून हे डम्पिंग ग्राउंड होत असल्यामुळे तुम्हाला आमच्या आरोग्याची काळजी वाटते. डम्पिंग ग्राउंडमुळे दुर्गंधीचा त्रास तर होईलच त्याबरोबरच हजारो रहिवाशांचे आरोग्यदेखील धोक्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया हिल क्रेस्ट सोसायटीचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांनी दिली.