‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ होणार सदिच्छादूत

मुंबई : थॅलेसिमिया आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता करण्यासाठी राज्य सरकारने ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची नियुक्ती करण्याचा सरकार विचार करीत आहे. यासंदर्भात जॅकी श्रॉफ यांनी नुकतीच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली.
थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवांशिक आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. त्यानुसार ‘थॅलेसिमियामुक्त महाराष्ट्र’ अभियान सरकारकडून हाती घेण्यात आले आहे. थॅलेसिमिया या गंभीर आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, सेवाभावी संस्था, संघटना, प्रतिष्ठित नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन कार्य करणे अत्यावश्यक आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे आणि या आजाराविषयी सर्वसामान्यांमध्ये अधिक व्यापक जनजागृती करावी, यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
हेही वाचा – “आपल्या हक्कावर गदा येत असेल तर टक्कर…”, छगन भुजबळांचा ओबीसी मेळाव्यातून मोठा इशारा
जॅकी श्रॉफ गेल्या काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसिमिया विषयावर सातत्याने कार्यरत आहेत. या आजाराविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. तसेच जॅकी श्रॉफ यांना यासंदर्भात शासनाला सहकार्य करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी प्रकाश आबिटकर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. राज्य शासनाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानासाठी जॅकी श्रॉफ यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्याबाबत या भेटीत अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आणि इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




