“हल्ला करणारे संघाचेच लोक”; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

नागपूर | जयपूर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विद्यार्थी आंदोलक अभिजित दिपके मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल झाले. “जयपूरमध्ये आमच्यावर हल्ला करणारे जे लोक समोर आले, ते संघाचेच होते,” असा थेट आरोप त्यांनी नागपुरात उतरताच केला. मात्र, संघभूमीत आलो असलो तरी आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानेच होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जयपूरमधील कथित हल्ल्यानंतर दिपके यांनी थेट नागपुरात आंदोलनाची पुढची फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या संपूर्ण आंदोलनाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. संघ मुख्यालयाच्या शहरात प्रवेश करतानाच त्यांनी हल्लेखोरांवर बोट ठेवत संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत अभिजित दिपके गेल्या काही महिन्यांपासून देशभरात आंदोलन करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, रखडलेली भरती प्रक्रिया आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवरून हे आंदोलन सुरू आहे.
हेही वाचा
भारतात ‘टेलिग्राम’वर बंदी! नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
जयपूरमधील घटनेचा उल्लेख करत दिपके म्हणाले, “आमच्यासाठी असे हल्ले नवे नाहीत. आमच्यावर कुणी कितीही अटॅक करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही समोरून हात उचलणार नाही. आम्ही सुरुवातीपासून सत्याग्रहाच्या मार्गाने चालत आलो आहोत आणि यापुढेही त्याच मार्गाने आंदोलन करू.” तसेच आपण गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असून कोणत्याही परिस्थितीत हिंसेला हिंसेने उत्तर देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार
अभिजित दिपके यांनी नागपुरातून केंद्र सरकारला इशारा दिला आहे की, देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला बांधले गेले असल्याने कोणत्याही दबावापुढे झुकून आंदोलन मागे घेणार नाही. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.
देशभराचे लक्ष नागपूरकडे
जयपूरमधील हल्ल्याच्या आरोपांनंतर थेट नागपुरातील संघ मुख्यालयापर्यंत पोहोचलेल्या या आंदोलनाकडे आता महाराष्ट्र सरकारसह देशभरातील विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था देखील सतर्क करण्यात आली आहे. हल्ल्यानंतरही अहिंसक संघर्षाची भूमिका कायम ठेवत दिपके यांनी नागपुरातून आंदोलनाचा नवा अध्याय सुरू केल्याने आगामी काळात येथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.





