लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीजबिल माफ करा, अन्यथा सरकारशी “असहकार” आंदोलन करू – रविकांत तुपकर

बुलडाणा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हाताला काम राहिले नाही.
त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे. यासाठी मा.खासदार राजू शेट्टी व चळवळीतील जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील सरांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले होते. त्या अनुषंगाने बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी षण्मुखाराजन यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
राज्यसरकारने तात्काळ वीजबिले माफ करावी अन्यथा राज्यभर विजबिले न भरण्याची मोहीम हाती घेऊन सरकारशी असहकार आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच वीज कंपन्यांकडून नागरिकांना अव्वाच्या-सव्वा बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत. वीज कंपन्यांनी वीजबिले भरण्यासाठी तगादा लावल्याने आत्महत्या झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारने 300 युनिट पर्यंतच्या ग्राहकांची वीजबिले तत्काळ माफ करावे या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.





