७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी-मराठी चित्रपटांचा दबदबा; ‘ट्वेल्थ फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

नवी दिल्ली | भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (१ ऑगस्ट) नवी दिल्ली येथे झाली. यंदा हिंदी आणि मराठी चित्रपटांनी दाक्षिणात्य चित्रपटांच्या वर्चस्वाला आव्हान देत पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण कमळ पुरस्कार पटकावला, तर मराठी चित्रपटांनीही विविध श्रेणींमध्ये आपली छाप पाडली.
‘ट्वेल्थ फेल’ या हिंदी चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांचेही मन जिंकले होते. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विक्रांत मेस्सी यांना शाहरुख खान (जवान) यांच्यासह सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला. तसेच, राणी मुखर्जी यांनी ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. हिंदी चित्रपट ‘कथल’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला.
हेही वाचा : रायगड संवर्धनासाठी निर्णायक पाऊल; संभाजीराजे छत्रपती आणि केंद्रीय मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक
मराठी चित्रपटांनीही यंदा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपला दबदबा दाखवला. सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. साने गुरुजी यांच्या आत्मचरित्रावर आधारित या चित्रपटात गौरी देशपांडे आणि ओम भूतकर यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तसेच, ‘नाळ २’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले. ‘जिप्सी’ या चित्रपटातील कबीर खंदारे यांनाही सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय, आशिष बेंडे यांना ‘आत्मपॅम्फ्लेट’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाने ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही नामांकन मिळवले होते. मराठी चित्रपटांनी यंदा आपल्या दर्जेदार कथानक आणि अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मान मिळवला.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे हे विजेते १ ऑगस्ट २०२५ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये जाहीर करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे फीचर फिल्म निर्णायक मंडळाचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी विजेत्यांची नावे घोषित केली.




