राज्याने 13 लाखांचा टप्पा ओलांडला

- मुंबईत 1,876, पुण्यात 3,628 नवे कोरोना रुग्ण
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. काल दिवसभरात राज्यात 17 हजार 794 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह महाराष्ट्राने 13 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 13 लाख 757 वर पोहोचली आहे. यापैकी 2 लाख 72 हजार 775 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तसेच शुक्रवारी राज्यात 19 हजार 592 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर 416 व्यक्तींनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यासह राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 9 लाख 73 हजार 214 इतकी झाला असून कोरोनाबळींचा आकडा 34 हजार 761 वर गेला आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत शुक्रवारी 1 हजार 876 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 48 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1 लाख 94 हजार 177 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 703 इतका झाला आहे. तसेच मुंबईत काल 1 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासह मुंबईत आतापर्यंत 1 लाख 56 हजार 807 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण 3 हजार 628 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील 1 हजार 621 रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात 95 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2 लाख 68 हजार 832 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 6 हजार 127 इतका झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 20 हजार 695 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.





