राज्यात यापुढे लॉकडाउन असणार नाही,आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची घोषणा
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनच्या बाबतीत एक महत्त्वाची घोषणा केली आहे…राज्यात आता यापुढे लॉकडाउन असणार नाही तर अनलॉक दोन आणि तीन असणार आहे अशी मोठी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केली आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत याची चिंता फारशी नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढते आहे त्याची चिंता जास्त आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
जुलै आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन आयसीयू बेड्स आणि डॉक्टर्सची संख्या वाढवत आहोत. एवढंच नाही तर राज्यातील कोरोना मृत्यू आम्ही लपवत नाही असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. कोरोना मृत्यूदर लपवल्याचा आरोप टोपे यांच्यावर झाला होता..त्यावर त्यांनी हे उत्तर देत या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे…तसेच कोरोनाचा मृत्यूदर वाढणार नाही याचीही काळजी आम्ही सर्वतोपरी घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे…
जुलै ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या वाढू शकते अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली. पुणे आणि सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख आढावा घेत आहोत असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी १ लाख अँटी जेन चाचण्या घेण्यात येणार आहेत त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची माहितीही टोपे यांनी यावेळी दिली…





