मुंबई-नाशिक मार्गावर अपघात, आईसह दोन मुलांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/ACCIDENTTAPE.jpg)
मुंबई | महाईन्यूज
मुंबई-नाशिक महामार्गावरील वालशिंद गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीवरील आईसह दोन लहान मुलांचा यात मृत्यू झाला. तर, पती गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. आपल्या मुलांसह हे दाम्पत्य राबोडी येथील पाहुण्यांकडे गेले होते. बोरिवली (पडघा) येथे परतत असताना शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी हा अपघात घडला.
अरबीना सलीम खान (26 ), वसीम खान (5 वर्ष 6 महिने) , रिहान खान (3 वर्ष ) अशी अपघातात ठार झालेल्या माय लेकांची नांवं आहेत. चालक पती सलीम खान (34) हा गंभीर जखमी झाला आहे. सलीम यांना उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा (ऑरेंज हॉस्पिटल ) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान हा त्यांच्या ठाणे इथल्या मामाकडे पत्नी व दोन मुलांना घेऊन होंडा शाईन दुचाकीवरून गेला होता. दुपारचे जेवण उरकून ते कुटुंबियांसह बोरिवली इथे घरी परतत होते. त्यावेळी वालशिंद गावच्या हद्दीत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील चौघेही रोडवर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून दुखापत झाली. अतिरक्तस्रावाने तिघा माय लेकांचा तडफडून जागीच मृत्यू झाला तर दुचालक पती सलीम हा देखील गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय दिपक भोई करीत आहेत.