चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्कूल बस अटेंडंटला १० वर्षांची शिक्षा

नर्सरीत शिकणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोनदा लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका स्कूल बस अटेंडंटला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईत २०१४ मध्ये ही घटना घडली होती. बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) कोर्टाने ५१ वर्षीय आरोपीला ही शिक्षा सुनावली.
याप्रकरणी विशेष सरकारी वकील मीरा चौधरी भोसले यांनी सांगितले की, प्रमुख साक्षीदारांमध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईचा समावेश होता. पीडित मुलगी सहा वर्षांची झाल्यानंतर तिला कोर्टासमोर सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी या पीडित मुलीने आपल्यावर घडलेला भयानक प्रसंग कोर्टासमोर कथन केला.
तिने कोर्टाला सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती स्कूल बसमध्ये एकटीच होती, त्यावेळी बसमध्ये ‘ब्ल्यू अंकल’ (निळ्या रंगाचा गणवेश घातलेला बस अटेंडंट) आणि ‘ब्राऊन अंकल’ (करड्या रंगाचा गणवेश घातलेला बस चालक) उपस्थित होते. मात्र, महिला अटेंडंट नव्हती. यावेळी ‘ब्लू अंकल’ने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बस अटेंडंट असलेल्या आरोपीने आपल्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचेही सांगत तीने आरोपीला कोर्टात ओळखले. तसेच पीडित मुलीच्या आईने देखील कोर्टाला सांगितले की, घटना घडली त्यावेळी बसमध्ये एक चालक आणि दोन अटेंडंट होते. आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगताना मुलगी आरोपीला ‘ब्लू अंकल’ म्हणून संबोधत होती. कारण त्याने निळ्या रंगाचा गणवेश घातलेला होता.





