एसीबीच्या प्रमुखाविरोधात सहकारी महिलेच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल
नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख पी. आर. पाटील यांच्याविरोधात सहकारी महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक छळ केल्याबद्दल गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील करोडो रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) ते अध्यक्ष आहेत.
पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक (एसीबी, नागपूर) यांच्यावर आपल्या टीममधल्या एका महिला कॉन्स्टेबलकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात २८ वर्षीय पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली. नागपूरचे सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांनी ही माहिती दिली.
कामाच्या जागी महिलांच्या छळाच्या तक्रारीसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, जारी करण्यात आलेल्या विशाखा गाईडलाइन्सनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबललने औपचारिक तक्रार दाखल केली. मुंबईस्थित एका महिला अधिकाऱ्याच्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीमध्ये पाटील दोषी आढळल्याने त्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसीबीचे राज्य समन्वयक पोलीस महानिरिक्षक संजय बर्वे यांनी याबाबतचे आदेश दिले.
यासंदर्भात पीडित कॉन्स्टेबल महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पी. आर. पाटील यांनी पदभार स्विकारल्यापासून १२ ऑक्टोबरपर्यंत आपला छळ केला जात होता. पाटील कायमच अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी करीत होते. तसेच आपल्याला वारंवार त्याच्या बंगल्यावर, रेस्ट हाऊसवर आणि हॉटेलवर बोलवत असे. त्याचबरोबर माझे दुसऱ्या एका सहकारी पोलीस निरिक्षकाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा बेछुट आरोपही त्यांनी केला होता. तसेच वारंवार ते आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मेसेज करीत असत. त्यांच्या या सगळ्या मागण्यांना विरोध केल्यानंतर पाटील यांनी आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच तक्रार दाखल करायला गेल्यानंतर पोलीस ठाण्यातून आपल्याला पालकांसह हाकलून देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आपला छळ करण्यास सुरुवात केली तसेच आपले चारित्र्यहनन करण्याचाही प्रयत्न केला.





