breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: टाळेबंदीचा परतीचा प्रवास

नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने देशभर लागू केलेली टाळेबंदी एकाच वेळी पूर्णत: मागे न घेण्याचा निर्णय शनिवारी केंद्र सरकारने घेतला. टाळेबंदीचा पाचवा टप्पा ३० जूनपर्यंत राहणार असला तरी, ८ जूनपासून नियंत्रित विभाग वगळता अन्य भागांमध्ये बहुतांश व्यवहार सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. त्यामुळे टाळेबंदी हळूहळू परतीच्या प्रवासाकडे निघाली आहे.

दोन महिन्यांहून अधिक काळ असलेली ही टाळेबंदी तीन टप्प्यांत मागे घेतली जाणार आहे. जुलैमध्ये दुसऱ्या टप्प्याचा निर्णय घेतला जाईल. टाळेबंदी मागे घेण्याच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्यांतर्गत टाळेबंदीची अंमलबजावणी होणार असल्याने करोनासंदर्भातील अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेतला जाईल.

पूर्वीप्रमाणे स्थानिक प्रशासन नियंत्रित आणि ‘बफर’ असे दोन विभाग निश्चित करतील. नियंत्रित विभागात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. अन्य व्यवहारांवर बंदी असेल. राज्य सरकारांना टाळेबंदीतील निर्बंध स्वतंत्रपणे शिथिल करण्याचा अधिकार नसेल.

८ जूनपासून रेस्ताराँ, हॉटेल, मॉल धार्मिक स्थळे खुली

पुढील आठवडय़ापासून (८ जून) रेस्ताराँ, हॉटेल, मॉल आणि अन्य आदरातिथ्य सेवा पुन्हा सुरू होतील. टाळेबंदीच्या परतीच्या प्रवासातील पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न आहे. या टप्प्यात धार्मिक स्थळे लोकांसाठी खुली केली जाणार आहेत. त्याची मागणी प्रामुख्याने भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक सरकारने केली होती. या विविध सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्वतंत्र नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे. देशांतर्गत विमानसेवा सुरू करतानाही प्रवाशांसाठी नव्या अटी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लागू केल्या आहेत. त्याच धर्तीवर सेवा ठिकाणांमध्ये करोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल.

तूर्तास बंद!

आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, चित्रपटगृहे, जिम्स, पोहण्याचे तलाव, मनोरंजनाची ठिकाणे, नाटय़गृहे, बार आदींबाबत अजून निर्णय घेतलेला नसल्याने तूर्तास ही सेवा केंद्रे बंद राहणार आहेत. याशिवाय करोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि अन्य प्रकारच्या सभा-समारंभाना मुभा देण्यात आलेली नाही.

आंतरराज्यीय प्रवासाला मुभा

आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली असल्याने व्यक्ती आणि वस्तूंच्या वाहतुकीवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता ई-पास घेण्याची गरज नाही. विशेष रेल्वेसेवा, श्रमिक रेल्वेगाडय़ा, प्रवासी विमानसेवा सुरू राहतील.

रात्रीची संचारबंदी ९ ते ५

रात्रीची संचारबंदीही शिथिल केली असून तिची वेळ रात्री ९ ते सकाळी ५ अशी बदलण्यात आली आहे. याआधी संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने काढले होते. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यातील हे बदल राज्य सरकारांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यांच्या शिफारशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यात आल्या होत्या. शिवाय नियंत्रित विभागाबाहेर व्यवहार सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर शनिवारी नवा आदेश काढण्यात आला.

शाळा-महाविद्यालयांचा निर्णय जुलैमध्ये

शाळा व महाविद्यलये जून महिन्यात तरी सुरू केली जाणार नाहीत. शैक्षणिक संस्था पूर्ववत खुली करण्याचा निर्णय जुलैमध्ये घेतला जाईल. त्यासाठी राज्य सरकारे, पालक तसेच तज्ज्ञ यांच्या शिफारशींचा विचार केला जाईल. हा टाळेबंदी मागे घेण्याचा दुसरा टप्पा असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button