breaking-newsपिंपरी / चिंचवड

#Lockdown:पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग सुरू करण्यास परवानगी, २ शिफ्टमध्ये होणार काम

उद्योगनगरी म्हणून परिचित असणारा पिंपरी-चिंचवड भोसरी परिसर तसेच पुण्याजवळच्या चाकण, तळेगाव, कुरकुंभ आणि रांजणगाव औद्योगिक परिसर सोमवारपासून अंशत: गती घेणार आहे. तिसऱ्या लॉकडाऊनच्या अखेरच्या चरणात राज्य सरकारने अनेक अटी, नियम अनिवार्य करून, अखेरीस ३३ टक्के क्षमतेने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. एरवी चोवीस तास फिरणारे येथील उद्योगांचे चक्र सध्या दोन शिफ्ट्सपुरते मर्यादित राहणार आहे. मात्र कामाला सुरुवात होणार असल्याने कामगारवर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यासंदर्भात म्हणाले, ‘राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना विविध नियमावलींचे पालन करून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीत ३३ टक्के कामगार परिस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सोयीचे होईल. कंपनीने कामगारांच्या प्रवासाची व त्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. कोणत्याही कामगाराला दुचाकीवर येण्यास प्रतिबंध आहे. पिंपरी-चिंचवड आणि औद्योगिक पट्ट्याच्या बाहेरच्या क्षेत्रातील कुणालाही कंपनीत येता येणार नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून कुणालाही येण्याची परवानगी नाही. प्रत्येकाला मास्क परिधान करणे अनिवार्य असेल. कंपनीत ठिकठिकाणी सॅनिटायझेशन स्टेशन्स उभारली पाहिजेत. कामाला सुरुवात होण्याआधी सर्व ठिकाणे निर्जंतुकीकरण केलेली असली पाहिजेत. स्वच्छतागृहांत ही काळजी विशेष घेतली गेली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कामासाठीचे पासचे वितरण सुरू

जिल्हा प्रशासनाकडून औद्योगिक भागातील कामासाठीचे पासचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड, भोसरी तसेच चाकण, तळेगाव, कुरकुंभ, रांजणगाव येथील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील कामगारांना ही माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक कामगाराने मोबाइलवर आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच पीसीएमसी स्मार्ट सारथी हे अॅप्लिकेशनही समाविष्ट करायचे आहे. या परिसरातील वाहन उद्योगांना लागणारे विविध प्रकारचे सुटे भाग प्रामुख्याने छोट्या आणि मध्यम उद्योगांतून तयार केले जातात. त्या उद्योगांना पुरवठादारांची साखळी काही अंशी सुरू करता येईल. -श्रावण हर्डीकर,आयुक्त पिंपरी चिंचवड

सॅनिटायझेशन सुविधा अनिवार्य

छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये सर्वसामान्यत: तीन शिफ्ट्स (पाळ्यांमध्ये) मध्ये काम चालते. आठ तासांची एक शिफ्ट अशा पद्धतीने चोवीस तास कंपन्यांमध्ये कामाचे चक्र चालू असते.मात्र, सध्या दोन शिफ्ट‌्समध्ये काम सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. कंपनीत बायोमेट्रिक हजेरी असेल तर त्या ठिकाणी सॅनिटायझेशन सुविधा अनिवार्य आहे. तसेच संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर, हँडवॉश युनिट असले पाहिजे, असे नियमावलींत नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे आयुक्तांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button