ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड : मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टला कायदेशीर नोटीस

छत्रपती संभाजी महाराज अवमानप्रकरणी संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

पुणे : चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी महाराज संजिवन समाधी मंदिर येथे माहिती फलकावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरला आहे. त्याविरोधात आक्रमक होत संभाजी ब्रिगेडने कायदेशीर पाऊले टाकली आहेत. वकिलांमार्फत नोटीस पाठवून हा फलक पूर्ण काढून खरा इतिहास सांगणारा फलक लावण्याची मागणी करण्यार आली आहे. तसेच चुकीची माहिती दिल्या बद्दल शिवप्रेमींची माफी मागावी, असे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे.

ऍड. अतुल पाटील यांच्या मार्फत नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले की, मंदिराच्या भिंतीवर लावण्यात आलेला “राजमाता महाराणी येसुबाई” हे शीर्षक असलेला मोठा माहिती फलक दिसला. सदर फलकावर “छत्रपती संभाजी महाराज यांच्या वधानंतर औरंगजेबाने राजमाता येसुबाई यांना अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले होते.औरंगजेबाने जाणुनबुजुन खाजगीचा खर्च करणेसाठी पैसे न दिल्याने व चार पाच महिना तनखा न झाल्याने राजमाता राणी येसुबाई यांना आर्थिक टंचाई जाणवत होती. लोकांचे कर्ज झाले होते. त्यावेळी राजमाता राणी येसुबाई यांनी पित्यासमान श्री. नारायण महाराज देव यांना पत्र पाठवून अशी हकीकत सांगितली. श्री नारायण महाराज देव यांनी त्यांना पाच हजार देवुन त्यांना आर्थिक मदत केली. त्यानंतर श्री. नारायण महाराज देव यांनी शाहु महाराज छत्रपती व्हावे म्हणुन अथक परिश्रम घेतले, असे नमूद होते.

वरील मजकुर वाचल्यानंतर आमचे अशिल उव्दिग्न झाले व त्या मजकुरातील भाषेमुळे त्यांच्या भावनांना प्रचंड ठेच पोहोचली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक शत्रूविरोधात लढा दिला. इतिहासातील अत्यंत शूर पराक्रमी योध्दा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा नावलौकिक आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडून त्यांना हालहाल करून मारले हा निर्वाह इतिहास आहे. औरंगजेबाने त्यांनी अत्यंत कूरपणे छळ करून हत्या केलेली आहे. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर न झुकता मृत्यु पत्करला.अशा प्रकारच्या अव्दितीय बलीदानाला ‘वध’ संबोधून तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केलेला असुन समस्त शंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत,असे नमूद केले आहे.

हेही वाचा – कचरा संकलन केंद्राचा डाव उधळून लावू; सोसायटी फेडरशेनचा इशारा

तसेच याच माहिती फलकातील उर्वरित मजकुर देखील राजमाता राणी येसुबाई यांचा अवमान करणारा आहे. स्वराज्याच्या कालखंडात स्वराज्यप्रमुख हे स्वराज्यातील मंदिराचे रक्षण व संवर्धन करत असत. त्यासाठी स्वराज्यातील अनेक मंदिरांच्या पुजारी / ब्राम्हणांना व सेवेकऱ्यांना तन्खा अथवा देणग्या दिल्या जात. त्यामुळे राजमाता महाराणींना एखादया मंदिरातील साधूने “पाच हजार रूपयांची आर्थिक मदत केली” हा माहिती फलकातील मजकुर चुकीचा व ऐतिहासिक वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे.

या माहिती फलकातील मजकुर पुर्णपणे काल्पनिक असुन कोणत्याही पुराव्यांचा अभ्यास न करता लिहीलेला आहे. सदरचा मजकुर हा माहिती फलकावर तसाच ठेवण्यात आल्यास मंदिरात येणाऱ्या कोणत्याही शिव प्रेमींची भावना दुखवली जाईल. तसेच त्यामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होवू शकते.

त्यामुळे ही नोटीस मिळाल्यापासुन दोन दिवसांच्या आत आपल्या मंदिरात लावण्यात आलेला वर नमुद फलक त्वरीत हटविण्यात यावा. वर नमुद माहिती फलकातील मजकुर कोणत्या ऐतिहासिक पुराव्यांच्या व कागदपत्रांच्या आधारे लिहीण्यात आला आहे. याची माहिती नोटीस मिळाल्यापासुन ८ दिवसांच्या आत माहिती देण्यात यावी,अन्यथा आमचे अशिल आपल्या विरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. सदरच्या बदनामीकारक मजकुर प्रसिध्द केल्याबद्दल समस्त शिवप्रेमींची स्थानिक वर्तमानपत्रांमधुन जाहिर माफी मागण्यात यावी,असे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. सदर नोटीस ॲड्. अतुल पाटील यांनी बजावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button