जागतिक जल दिनानिमित्त ६३५ ग्रामपंचायतींना मिळणार अभिनंदन पत्र
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक

सोलापूर : जागतिक जल दिनानिमित्त शनिवारी (ता. २२) जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल पोचविलेल्या जिल्ह्यातील ६३५ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून अभिनंदन पत्र दिले जाणार आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे महत्त्व, वापर याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांची स्वच्छता फेरी, ग्रामस्थांची स्वच्छता दिंडी, पिण्याच्या जलस्रोतांची स्वच्छता, क्लोरिनेशन प्रात्यक्षिक आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम म्हणाले, जलदिनानिमित्त पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंवर्धन, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण व स्वच्छता, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छता, पाऊस पाणी संकलनासाठी नियोजन, भूजल साठा वाढविण्यासाठी गाव परिसरात पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविणे राबविणे गरजेचे आहे.
याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जलप्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पुढील ३० वर्षांपर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध राहील. गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिव्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, यासाठी ग्रामस्थांसमवेत नियोजन करावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी केले आहे.
तालुका स्तरावर देणार अभिनंदन पत्र
जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, उपअभियंता यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडून अभिनंदन पत्र वितरित करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुले होण्यासाठी आणखी प्रतीक्षा
तालुका, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती उपक्रम
– १०० टक्के वैयक्तिक नळजोड पूर्ण होऊन हर घर जल ग्रामपंचायत होण्यासाठी बैठक घेणार
– हर घर नल से जल मोहिमेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून किमान १० गावे घोषित करून त्याची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणार
– पाणी गुणवत्ता मोहिमेअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाचे व एफटीकेबाबत जैविक तपासणी मोहीम राबविणार
– शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतींच्या पाणी टाक्या साफ करणार, वैयक्तिक नळजोड असल्याची खात्री करणार
– ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता समिती समवेत लोकवर्गणी व पाणीपट्टी गोळा करणार
– वैयक्तिक नळजोड नोंदीबाबत गाव स्तरावर आधार कार्ड गोळा करून ऑनलाइन नोंदणी करणार
– प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून पथनाट्याद्वारे जनजागृती करणार
– कोपरा बैठका, गृहसभा, माहिती, शिक्षण व संवादपर उपक्रम राबविणार