Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्यात यावा, तसेच प्रलंबित विषयांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

बैठकीत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी विभागाच्या आकृतीबंधाची तातडीने अंमलबजावणी, विविध संवर्गांसाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करणे, पदोन्नती प्रक्रियेला गती देणे तसेच आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्याबाबतच्या मागण्या मांडल्या. या सर्व विषयांवर शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

हेही वाचा –  ‘मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करणार’; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

संघटनेने सर्व संवर्गांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करण्याची मागणी केली. विशेषतः वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच वर्ग-३ संवर्गातील पदांसाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. विभागाचे कामकाज अधिक प्रभावी आणि सुरळीत होण्यासाठी ही प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले. तसेच वरिष्ठ लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक पदावरील पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

याशिवाय, प्रतिनियुक्ती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदलीचा प्रश्न, प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदली कायदा २००५ लागू करण्याची मागणी; तसेच अन्य प्रलंबित प्रशासकीय विषयांवरही संघटनेने सविस्तर मांडणी केली. त्यावर सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर आयुक्त भरत कळसकर, सह आयुक्त संजय मैत्रेवार, सह आयुक्त रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button