उद्धव ठाकरे यांची अवस्था जत्रेत चुकलेल्या मुलासारखी !
महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर दोन मुद्दे प्रामुख्यानं विचारात घ्यायला हवेत. पहिला म्हणजे राजकारणात कुणी कुणाचं नसतं.. अन् दुसरा म्हणजे कुणी कितीही फुशारक्या मारल्या, तरी तुमची लायकी जनता ठरवते ! आज महाराष्ट्रातल्या राजकारणात जे उलटफेर पाहायला मिळतात, त्याचा अर्थ समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गेली अडीच वर्षे आणि विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर ज्या देवेंद्र फडणवीस यांचा उद्धार अगदी खालच्या थरावर जाऊन सर्व विरोधकांनी केला, त्याच फडणवीस यांना जनतेनं महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रेम आणि आदर दिलाय.. आज ते प्रचंड बहुमत घेऊन मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत..ध्रुवबाळाप्रमाणं त्यांचं स्थान आता पाच वर्ष अढळ आहे ! याउलट, ज्यांनी उसन्या ताकदीच्या जोरावर दंडाच्या बेटकुळ्या फुगवल्या होत्या, त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटालाही जनतेनं जागा दाखवून दिली आहे. दुर्दैव असं की त्यांची तर अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे.
ऊठसूठ देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा सपाटा शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी लावला होता. पण, मतदार राजा सर्वश्रेष्ठ असल्यामुळं त्यांचे दहा आमदार सुद्धा निवडून आले नाहीत. जनतेनं पार सुपडा साफ केला. तिकडं उबाठा गटाची अवस्था तर जत्रेत चुकलेल्या एखाद्या हट्टी मुलासारखी झालीय. दिशा दाखवणारे पालक नाहीत, आई-वडील सापडत नाहीत, स्वतःचं नाव सांगता येत नाही, केवळ आक्रोश करून दिशा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शिवीगाळ,टोमणे आणि खालची भाषा!
गेली अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेनं एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना ‘लक्ष्य’ केलं होतं. स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नको, नको ती भाषा वापरून फडणवीस यांना अक्षरशः शिवीगाळ केली. पण, जनतेला हे देखील पटलं नाही. विधानसभा निवडणुकीत या उबाठा गटाला मतदारांनी चक्क तोंडावर पाडलं. साधं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा त्यांना मिळालं नाही. त्यासाठी पुन्हा फडणवीस यांचेच पाय धरण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली, हे सर्वांनीच पाहिलं !
आत्ताच्या निवडणुकीनंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात पाच वर्षे भक्कम सरकार आल्याचं वास्तव पुढं आलं आहे आणि सोनिया काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, याचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं घेतला आहे. भाजपाबरोबर युती असताना आणि बहुमत मिळालं असताना २०१९ मध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वांना, भूमिकेला आणि हिंदुत्ववादाला सोडचिठ्ठी देऊन केवळ मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेलं जनतेनं पाहिलं आहे. दुसरीकडं भाजपाद्वेषानं पछाडलेल्या नाना पटोले यांची काँग्रेस आणि शरद पवारांची काँग्रेस नीतिमत्ता सोडून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिल्याचंही पाहिलं आहे. याचा नेमका तडाखा मतदारांनी दिला आणि ‘महायुती’ ला भरभरून मतदान केलं, हा इतिहासही ताजा आहे.
उबाठा गट ..ना घरका, ना घाटका !
या सगळ्या समुद्रमंथनामध्ये सर्वात मोठा फटका बसला, तो उद्धव ठाकरे गटाला. एक तर त्यांचा सर्व पक्ष घेऊन, पक्षाचं नाव-चिन्ह घेऊन आणि वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे निघून गेले. उरलेला तोडका मोडका पक्ष घेऊन त्याची उभारणी करण्याऐवजी त्याची सूत्रं संजय राऊत आणि सुषमा अंधारेंसारख्या अपरिपक्व आणि बेछूट प्रवक्त्यांच्या हाती गेली. त्यांनी विरोधकांना फक्त शिवीगाळ करणे, टोमणे मारणे यामध्ये अडीच वर्ष घालवली. महाराष्ट्राचा विकास कसा करणार? महाराष्ट्राबाबतची दूरदृष्टी नाही, कोणतेही ठोस काम किंवा आश्वासन नाही.. फक्त एकनाथ शिंदे सरकारच्या प्रत्येक प्रकल्पावर विरोधी वक्तव्य करणे, त्यांना स्थगिती आणणे किंवा अर्वाच्य भाषेत उद्धार करणे.. असलं खालच्या थराचं राजकारण केल्याचा परिणाम उबाठा गट भोगत आहे.
बरं, हे दोन्ही प्रवक्ते उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेची भूमिका मांडत होते का? याचं उत्तर “मुळीच नाही”, असंच द्यावं लागेल. संजय राऊत रोज सकाळी उठल्यावर समाज माध्यमांसमोर येऊन जी बाष्कळ बडबड करत होते, त्याचा फटका फक्त उबाठा गटाला बसला नाही, तर शरद पवार गट आणि काँग्रेस यांनाही आपल्याबरोबर उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक पक्षाची भूमिका मांडण्याऐवजी ते रोज काँग्रेसची आणि शरद पवार गटाची भूमिका मांडत होते, आणि उद्धव ठाकरे गट कसा दिशाहीन आहे, या दोघांच्यावर कसा अवलंबून आहे, हे सांगत होते, हे काय जनतेला समजत नव्हतं काय ? संजय राऊत हे शरद पवार गटाचे प्रवक्ते होते का काँग्रेसचे.. याचं उत्तरही स्वतः उद्धव ठाकरे देऊ शकणार नाहीत. यामुळं झालं काय, आता काँग्रेस आणि शरद पवार गट हे आपल्या अपयशाचं खापर उबाठा गटावर फोडायला लागले आहेत. ते दोघेही भाजपाशी जुळवून घेऊ शकतात. पण, उबाठा गटांनं भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांना एवढं दुखावलं आहे, की त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी ते गेले, तरी त्यांना जवळ घेण्याची मानसिकता भाजपाकडं नाही.
दुसऱ्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या देवदेवतांबरोबरच वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा अवमान करण्यात आयुष्य घालवलेल्या ! त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रवक्तेपद देण्याची चूक फक्त उद्धव ठाकरे यांच्यासारखा माणूसच करू शकतो. त्यांनी माध्यमांसमोर ज्या ज्या वेळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी त्या मार्क्सवाद किंवा शहरी नक्षलवाद याची पाठाराखण करत बसल्या, हे आता लपून राहिलेलं नाही.
आधुनिक शकुनी आणि मंथरा एकत्र
आता, मूळ मुद्द्याकडं परत येऊ. संजय राऊत काँग्रेसची भूमिका मांडणार आणि सुषमा अंधारे नेहमीच मार्क्सवाद किंवा नक्षलवाद्यांची बाजू घेणार.. मग, उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडायलाच सगळे विसरले.. आणि होणारा परिणाम झाला. या दोघांच्या रूपानं आधुनिक शकुनीमामा आणि मंथरा एकत्र झाले, त्यामुळं राजकीय सारीपाटावर उद्धव ठाकरेंचे उंट, हत्ती, घोडे भरकटले आपली भूमिका आणि चालच विसरले. बुद्धिबळात एकटा राजा असून उपयोग नसतो, तर त्याला खंबीर साथ देणारा वजीर लागतो..उद्धव ठाकरे यांच्याकडे नेमकी वजीराची वानवा होती, आणि त्याचे परिणाम ते भोगत आहेत. जत्रेत चुकलेल्या मुलाची उपमा एवढ्यासाठी द्यावी वाटते , की त्याला दिशा समजत नाही..आई-वडिलांचा हात सुटल्यामुळं हिंदुत्व दूर पळालं आहे, आणि ज्यांच्याकडे पालकत्व दिलं होतं, त्यांनी भरकटवून ठेवलं आहे, दिशाहीन करून टाकलं आहे.
उद्धव ठाकरेंचं नशीबच फुटकं!
त्यातच आज एक अतिशय भयावह बातमी येऊन धडकली आहे. या बातमीचा पुरावा अद्याप मिळाला नाही. पण, भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ संपादक- पत्रकाराने त्यांच्या सूत्रांचा हवाला दिला आहे. त्याचं काय झालं.. मुंबई महानगरपालिकेसाठी व्यूहरचना करण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची आणि काही आमदारांची बैठक बोलावली होती. त्यात प्रचंड राडा झाला. संतप्त कार्यकर्त्यांनी विधानसभा पराभवाचं खापर संजय राऊत यांच्यावर फोडलं, त्यांना मारहाण केली आणि तीन तास एका खोलीमध्ये डांबून ठेवलं..ही तेथील ठराविक कार्यकर्त्यांची मानसिकता नाही, तर वंदनीय बाळासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाची ती भावना आहे, ‘मातोश्री’ वर ती प्रकट झाली एवढेच ! यापेक्षा, उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी दुसरी मोठी घटना म्हणजे मुंबईचे काही माजी नगरसेवक आणि पुण्याचे काही माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत !
उद्धव ठाकरे यांची दशा ‘असंगाशी संग’ अशी झाली असून आपल्या अश्वमेधाची सूत्रं नको त्या सारथ्याकडं दिली, तर त्याचे परिणाम काय होतात, अशी झाली आहे. ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था झालेले उद्धव ठाकरे दिवसेंदिवस जास्तीत जास्त गाळात चालले आहेत, चुकीचे सल्ले ऐकून स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहेत. त्यांना सावरण्याची कुवत ना आदित्य ठाकरेंमध्ये आहे, ना वरूण सरदेसाईंमध्ये ! बाकीची शिल्लक मंडळी, आपल्या घसरगुंडीचं खापर शकुनी-मंथरा जोडीवर फोडून संधी मिळाली की दुसऱ्या पक्षात हळूच उडी मारणार आहेत. पण, हे समजून घेण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांची आहे का? हा खरा प्रश्न आहे.
एवढं सगळं रामायण, महाभारत घडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे डोळे आता तरी उघडतील आणि 2019 उचललेली पावले चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावे आणि त्याचे समर्थन करण्यात आपण पाच वर्षे फुकट घालवली, हे शिल्लक सहकाऱ्यांना समजावून सांगावे. अजूनही विधानसभेत आणि त्या आधारावर महाराष्ट्रात मुख्य विरोधी पक्ष होण्याची त्यांना संधी आहे. त्याचप्रमाणे ते अजूनही मुंबई महानगरपालिका जिंकू शकतील. ज्यांनी चुकीच्या मार्गाने नेले त्यांना बाजूला करून निवडणुकीसाठी पुन्हा सज्ज व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कधीही एकीकरणाची घोषणा करु शकतात, हे लक्षात ठेवावे. शरद पवार यांचा टेकू उपयोगाचा नाही, भरवशाचा मुळीच नाही.. एवढे ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, त्या दिवशी त्यांचा अनुकूल काळ सुरु होईल. सध्या मात्र त्यांच्या गटाची अवस्था, फार विचित्र झाली आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल, हे नक्की!





