कुत्र्यांपासून वाघांना धोका! कान्हा व्याघ्र प्रकल्पात एकाच वेळी पाच वाघांचा मृत्यू

Canine Distemper Virus | मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्पातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. देशात सर्वाधिक वाघ असलेल्या या राज्यात पहिल्यांदाच केनाइन डिस्टेंपर व्हायरस (CDV) मुळे एका वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातील वन्यजीवप्रेमींमध्ये खळबळ उडाली असून वन्यजीव विभागात चिंतेचे वातावरण आहे.
मृत झालेली ‘टी-१४१’ ही वाघीण काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या चार बछड्यांसह जंगलात सुरक्षितपणे वावरत होती. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याचे गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. वाघीण आणि बछडे अत्यंत अशक्त आणि आजारी अवस्थेत आढळल्यानंतर वन विभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, या घातक व्हायरसने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट केल्यामुळे वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय पथकाचे प्रयत्न अपयशी ठरले आणि पाचही वन्यजीवांचा मृत्यू झाला.
हेही वाचा
राज्यात पावसाचा इशारा; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात ‘यलो अलर्ट’
नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणीत या मृत्यूंचे कारण केनाइन डिस्टेंपर व्हायरस असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा व्हायरस अत्यंत घातक मानला जातो; याच संसर्गामुळे २०१८ मध्ये गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात ३४ सिंहांचा बळी गेला होता. आता या व्हायरसने कान्हा व्याघ्र प्रकल्पात शिरकाव केल्याने राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वन विभागाच्या प्राथमिक तपासणीनुसार, हा व्हायरस प्रामुख्याने पाळीव आणि भटक्या कुत्र्यांमध्ये आढळतो. जंगलाच्या सीमावर्ती भागातील कुत्र्यांच्या संपर्कात आल्यामुळे हा संसर्ग वाघांपर्यंत पोहोचल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेला पाचारण करण्यात आले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून कान्हा प्रशासनाने प्रभावित परिसरातील सुमारे दोन चौरस किलोमीटरचे क्षेत्र सील करून ‘नो-गो झोन’ म्हणून घोषित केले आहे. या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी परिसरातील ८ गावांमधील कुत्र्यांचे लसीकरण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच जंगलातील जलस्रोतांवर कडक नजर ठेवली जात असून ४० ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. कान्हातील या घटनेनंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांतील व्याघ्र प्रकल्पांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.





