राज्यात पावसाचा इशारा; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather | राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून काही भागात पावसाची नोंद होत आहे तर काही भागात कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. दरम्यान शनिवारपर्यंत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून यादरम्यान वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीटीचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे गुरुवारी राज्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मागील काही दिवसांपूर्वी विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटसदृश्य स्थिती निर्माण झाली होती आणि तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, पुढील चार दिवसात राज्यातील कमाल तापमानात पुन्हा २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात उकाड्यात वाढ होऊन नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
हेही वाचा
पुण्यात तीन महिन्यांत पॉक्सोचे ५० गुन्हे; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी हवामान असून काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली आहे. शनिवारपर्यंत या भागात पावसाची शक्यता असून त्यानंतर हवामान पुन्हा कोरडे होईल असा अंदाज आहे. कोकण प्रदेशात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मात्र उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद करण्यात आली आहे.
गुरुवारी नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कोकणातील उर्वरित भागात मात्र शनिवारपर्यंत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.





