कोरोनाविरोधातील लढ्यात सातत्याने प्रयोग आणि बदल आवश्यक – नरेंद्र मोदी
![# Covid-19: Get vaccinated without believing rumors- PM](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/modi_1_20200427_571_855-1-1.jpg)
नवी दिल्ली – करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा वेगवेगळ्या राज्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रासहीत १० राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, हरयाणा, केरळ, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील जिल्हाधिकारी आणि फिल्ड अधिकारी पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत सहभागी झाले आहेत.
‘एका लसीचा अपव्यय म्हणजे एका आयुष्याला आवश्यक ते सुरक्षा कवच प्रदान करण्यात अपयश, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी लसीचा अपव्यय टाळण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिलाय.
कोरोना संक्रमण हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठं संकट आहे. कोरोना संक्रमणानं तुमच्यासमोरच्या आव्हानांत वाढ केलीय. याअगोदरचे साथीचे आजार असोत किंवा कोरोना संक्रमण, महामारीनं आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवली आहे. ती म्हणजे, अशा परिस्थिती संकटाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांत सातत्यानं आवश्यक बदल आणि प्रयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. हा विषाणू आपली रुपं बदलण्यात चलाख आहे. त्यामुळे आपल्या पद्धती आणि रणनीती विस्तृत असायला हव्यात’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांसोबतच्या बैटकीत म्हटलंय.
‘प्रत्यक्ष युद्धभूमीवर केलेल्या कार्यातून, आपल्या अनुभवातून आणि त्यातून सुचवलेल्या सल्ल्यांतून व्यवहारिक आणि प्रभावी रणनीती आखता येऊ शकते, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.
वेगवेगळ्या ठिकाणच्या कोरोना संक्रमण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत देशातील ५६ जिल्ह्यांपैंकी महाराष्ट्रातील १७ जिल्हांचा समावेश आहे. यामध्ये अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलडाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.