दहशतवाद्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भारताने उघडा पाडला पाकिस्तानचा खोटारडेपणा

Foreign Secretary Vikram Misri | ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने सामान्य नागरिक मारल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने हा दावा खोटा ठरवत पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत ठोस पुरावे सादर करत दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार दिल्याचे उघड केले.
ऑपरेशन सिंदूरमुळे खवळलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळांचा मारा केला. या हल्ल्यात १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, तर एक लष्करी अधिकारी शहीद झाला. पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने जोरदार प्रत्युत्तर देत लाहोरमधील रडार डिफेन्स सिस्टिम ड्रोन हल्ल्याद्वारे उद्ध्वस्त केली.
हेही वाचा : ऑपरेशन सिंदुर अजूनही सुरूच; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती
दहशतवाद्यांचे शासकीय अंत्यसंस्कार
विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा पुन्हा अधोरेखित केला. यावेळी त्यांनी मृत दहशतवाद्यांवर पाकिस्तानने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केल्याचे फोटो दाखवले. या फोटोंमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि अधिकारी अंत्यसंस्कारांना उपस्थित असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी प्रार्थना करतानाही दिसला.
“दहशतवाद्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देण्याची पाकिस्तानमध्ये पद्धत आहे का?” असा थेट सवाल विक्रम मिस्री यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “जर भारताच्या हल्ल्यात सामान्य नागरिक मारले गेले असते, तर त्यांचे अंत्यसंस्कार पाकिस्तानी ध्वजात लपेटून शासकीय इतमामात का केले जातात? सामान्य नागरिकांना अशा पद्धतीने अंत्यसंस्कार दिले जात असतील तर हे आश्चर्यकारक आहे.”
विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाशी असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकला. “या फोटोंमधून पाकिस्तानला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील कनेक्शन जगासमोर उघड झाले आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. ऑपरेशन सिंदूरमुळे जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांना मोठा फटका बसला आहे.